दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून कांशीराम यांचा वापर, “दलित गौरव संवाद” यात्रेचे केले आयोजन..

109

उत्तर प्रदेशमध्येही दलितांना केंद्रस्थानी ठेवून काँग्रेस विविध कार्यक्रमांची आखणी करत आहे. यासाठीच काँग्रेसकडून बहुजन समाज पक्षाचे संस्थापक दिवंगत कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त “दलित गौरव संवाद” यात्रा काढण्यात येणार आहे. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी कांशीराम यांच्या पुण्यतिथीपासून दीड महिन्यांच्या या दलित गौरव संवादाची सुरुवात होईल. कांशीराम यांची विचारधारा पसरविण्यासाठी आणि दलितांशी संवाद साधण्यासाठी सदर यात्रा काढली जात असल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे.

बाराबंकी येथून ९ ऑक्टोबर रोजी या यात्रेची सुरुवात केली जाईल. कांशीराम हे राष्ट्रीय पातळीवरचे दलित नेते असून त्यांना एका पक्षापुरते मर्यादित ठेवता येणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिली. या यात्रेदरम्यान अनुसूचित जातीमधील दोन लाख सदस्यांना ‘दलित अधिकार पत्र’ देण्यात येणार आहे. या पत्रावर त्यांच्या पाच महत्त्वाच्या मागण्या लिहून देण्यास सांगितले जाईल.

अनुसूचित जातीचे लोक राहत असलेल्या वस्त्यांमध्ये १० रात्रीचे चौपाल आयोजित केले जातील, त्याद्वारे त्यांच्याशी संबंधित प्रश्नांची चर्चा केली जाईल, १८ प्रादेशिक पदयात्रा काढण्यात येणार आहेत आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक असे ८० कोअर गट तयार करण्यात येतील. या सर्वांमधून कांशीराम यांचे विचारांना पुन्हा स्मरण करण्याचे काम केले जाईल.

२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने दलित गौरव संवाद यात्रेचा शेवट केला जाईल. यादिवशी दलितांच्या अधिकारावर चर्चा करण्यासाठी एक मोठे अधिवेशन घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने आपल्या बातमीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे बसपा प्रमुख मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए युतीपासून अंतर राखल्यानंतर काँग्रेसकडून कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. भाजपाविरोधी पक्षांना अजूनही मायावती त्यांच्याबाजूने येतील, अशी आशा आहे.

यावर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘जितनी आबादी, उतना हक’, अशी एक घोषणा दिली होती. ही घोषणा कांशीराम यांच्या “जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी” या घोषणेशी साधर्म्य दर्शविणारी होती. कांशीराम यांनी या घोषणेद्वारे मागासवर्गीय समाजाला एकत्र केले होते

.उत्तर प्रदेश काँग्रेस संघटनेचे सचिव अनिल यादव म्हणाले, “कांशीराम हे बहुजन चळवळीतील एक मोठे नेते आहेत. ते कोणत्या एका पक्षापेक्षाही मोठे आदर्शवादी नेते आहेत. आमचे नेते राहुल गांधी हे अनेकदा कांशीराम यांच्या विचारधारेबाबत चर्चा करत असतात. आम्ही कांशीराम यांचे विचार समाजात नेत असताना दलित समाज आणि त्यांच्या हक्कांबद्दल चर्चा करणार आहोत.”

काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, प्रभावशाली दलित मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जातीमधील डॉक्टर, अभियंते, ग्राम प्रधान, व्यावसायिक, विचारवंत आणि शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मंडळीशी केलेल्या परस्परसंवादाच्या आधारे तयार केलेला कोअर गट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना मार्गदर्शन करण्याचे काम करेल.

काँग्रेस नेत्याने सांगितले की, ब्राह्मण समाजासह दलित एकेकाळी काँग्रेसचा मुख्य मतदारवर्ग राहिला आहे. मात्र कालांतराने उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जातींची मते काँग्रेसच्या हातातून निसटली. याकाळात बहुजन समाज पक्ष हा दलितांचा प्रमुख पक्ष म्हणून पुढे आला. पुढे नरेंद्र मोदी यांचा उदय आणि मायावती यांच्या नेतृत्वाखाली बसपाची घसरण होत असताना भाजपाने अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला.