रक्षा बंधन : हिंदु-मुस्लिम एकतेचं प्रतिक.

150

श्रावणमास पर्व हे समाज जीवनाचे प्रतिबिंब आहे. रक्षाबंधन हे एक सामाजिक व धार्मिक पर्व आहे. हे पर्व सामाजिक परंपरेमध्ये सद्भाव, स्नेह, आत्मियता, बंधुभाव, कौटुंबिक एकात्मता यांचा प्रवाह निर्माण करणारे आहे. खऱ्या अर्थाने संस्कृतीला समृध्द बनविणारे, आध्यात्मिक स्पर्शाने जनमनाला पुलंकित करणारे पर्व आहे, रक्षाबंधन पर्व ! राणी कर्णावतीने आपल्या रक्षणासाठी हुमायुँ राजाला भाऊ मानून बांधलेली राखी इतिहासाच्या पानावर कोरल्या गेली. हिंदू-मुस्लिम यांच्यामधील स्नेह व एकी निर्माण करणारी ही जीवंत साक्षच आहे. ‘स्त्री’ जातीच्या रक्षणासाठी धर्म, जाती, लिंग या भेदांना छेदून पुढे टाकलेले एक पाऊल आहे हे! राष्ट्रीय एकात्मेला पोषक व वर्धक प्रसंग समाजात सद्भावना व सत्प्रवृत्तींचे पोषण करण्याचे कार्य करतात. आपल्या भाऊरायाला बहीण राखी बांधते व आपल्या रक्षणाची अप्रत्यक्षरीत्या हमीघे ते. हिंदू संस्कृतीतील समाजमुल्यांचे पोषण करणारी ही सामाजिक परंपरा आजही मोठया दिमाखाने देशात सर्वत्र नांदतांना दिसत आहे.

रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडुन मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. शेवटी श्रध्दा खरी ठरली आणि इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.

हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले. राखी बांधताना बहिणीने म्हणावे, – येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।। (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होत तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे.)

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येतेवेळी त्याला शांत करण्यासाठी नारळानी पुजा केली जाते किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला “रक्षाबंधन” म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.

उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.

बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|’ ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणापासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न ह्या सणाद्वारे केला जातो.

“राखी” ह्या शब्दातच “रक्षण कर” – “राख म्हणजे सांभाळ” हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.

काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्या पेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, स्नेह बळकट होऊन जातात.

जैन परंपरेमध्ये सातशे मुनींवर दृष्ट प्रवृत्तीने केलेल्या उपसर्गाला दुर करण्याचे कार्य या पर्वमध्ये झाले. जैन लोक रक्षाबंधनाच्या दिवशी जैन मंदिरात जाऊन अभिषेक-पूजन करुन मुनीं प्रती हृदयभाव ठेवून पंडित-पुजाऱ्यांच्या हस्ते राखी बांधून हे पर्व साजरे करतात. धर्मरक्षणाचे चकं कण आहे ते ! प्रथम धार्मीक व नंतर सामाजिक दायित्व पार पाडले जाते. हे पर्वधर्म व धर्मावलय यांच्येशी मातृत्व भावनेतून जोडणारेआहे. संस्कृती व धर्म समर्पणाच्या भावनेला वृध्दिगत करणारे आहे. श्रमण संस्कृतिमध्ये रक्षाबंधनाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. ईश्वरप्रती समर्पणाची भावना व संस्कृतिचा अत्यंत आदरया भावनांना श्रेष्ठस्थान दिले गेले आहे. सामाजिक दृष्टिकोनातून रक्षाबंधन हे वात्सल्य व बंधुभावाचे परिपाक पर्व आहे. बंधुभाव व स्नेहवर्धनाचे पाठया पर्वामुळे गिरविले जातात. समाज व धर्म या पेक्षाश्रेष्ठ आहे राष्ट्रधर्म ! म्हणून सामाजिक व धार्मीक अस्तित्व टिकविण्याची आज राष्ट्राचे अस्तित्व टिकविण्याची, त्याचे जतन करण्याची गरजभासत आहे. ही महान जबाबदारी आज आपणांवर आहे. ती नेटाने करणे गरजेचे आहे, त्यामुळेही घडी नीट घट्ट बसेल.

रक्षाबंधनाच्या निमीत्ताने पर्यावरणाचे रक्षण, ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा आणि स्त्रीभृणहत्या रोखण्याचा संदेश राखीच्या माध्यमातून करण्याचा निर्धार भाऊ-बहिण आणि समस्त भारतीयांनी या नाजुक पर्वावर केला पाहिजे.

लेखक : प्रविण बागडे, (नागपूर)

भ्रमणध्वनी : 9923620919

ई-मेल : pravinbagde@gmail.com

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ