स्वातंत्र्य : कुणाला काय मिळाले? – कॉ. गोविंद पानसरे

241

भारतीय स्वातंत्र्याचा लढा 150 वर्षाहूनही कितीतरी अधिक वर्ष चालू होता. या आंदोलनात मूठभर लोक सोडले तर जवळ जवळ सर्व भारतीय समाज सहभागी होता. सर्वांचा सहभाग सारखाच होता. असे नाही परंतू सर्वांना स्वातंत्र्य हवे होते.

हे स्वातंत्र्य आंदोलन एकाच मार्गाने लढविले गेले हे मात्र खरे नाही. प्रत्येक 15 ऑगस्ट रोजी आणि 26 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांना उद्देशून लिहलेले व लोकप्रिय केलेले एक फिल्मी गीत हमखास वाजविले जाते या गिताचे बोल आहेत “ दे दी हमे आझादी, बिना खड्ग बिना ढाल । साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।” महात्मा गांधी हे स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांपैकी सर्वात मोठे आणि सर्वात परिणाम कारक नेते होते. ही गोष्ट खरी आहे परंतू ते एकमेक नेते होते हे खरे नाही. स्वातंत्र्य आंदोलनाच्या नेत्यात भगतसिंग आणि त्यांचे सहकारी, नेताजी सुभाषचंद्र बोस व त्यांचे सहकारी, क्रातीसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी 1946 च्या फेबु्रवारी महिन्यात तेव्हांच्या ब्रिटीश आरामारातील उठाव केलेले नवसैनिक आणि त्यांना मुंबईच्या रस्त्यावर बॅरिकेट्स तयार करून शस्त्रास्त्राने लढलेले कामगार असे कितीतरी भिन्न प्रवाह होते. अगदी सुरवातीचा काळ घेतला तर उमाजी नाईक, तंट्या भिल्ल यांच्या सारखे छोटे-मोठे उठाव ज्यांनी केले त्यांचाही समावेश करावा लागेल. उदाहरणादाखल कांही नावे दिली आहेत ही यादी खूपच मोठी आहे. अशी यादी केल्याने महात्मा गांधीचे महत्व कमी होत नाही. ते एकमेव नेते नव्हते एवढेच त्यामूळे अधोरेखित होते.

तेव्हांच्या कॉग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील आंदोलन हे सर्वात मोठे आंदोलन होते आणि सर्वात परिणामकारक आंदोलन होते. हे मूल्यमापन ही बरोबर ठरेल. परंतू कॉग्रेस पक्ष ज्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करीत होता त्या विचारसरणीची एकमेवता नव्हती.

कम्युनिस्ट विचारसरणीचे नेत, कार्यकर्ते व आंदोलक, सोशॅलिस्ट विचारसरणाीचे नेते, कार्यकर्ते, आंदोलक यांचा आणि इतरही कांही वैचारिक प्रवाह या आंदोलनात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (R.S.S.) जी विचारसरणी मानतो त्या विचारसरणीचे नेते व कार्यकर्ते मात्र्य स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले नव्हते. आर.एस.एस. चे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाचा उल्लेख आजही कांही आर.एस.एस. वाले आवर्जुन करतात. परंतू ते जेव्हां स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. तेंव्हा ते कॉग्रेस पक्षात होते हे सांगायचे ते मुद्दाम टाळतात. असो आर.एस.एस. आणि स्वातंत्र्य आंदोलन हा एक स्वतंत्रपणे आणि सविस्तरपणे मांडण्याचा वेगळा विषय आहे.

भिन्न प्रवाह, भिन्न विचारसरणी, भिन्न हेतु

स्वातंत्र्य आंदोलनात ज्या प्रमाणे भिन्न प्रवाह होते, त्याप्रमाणे स्वातंत्र्य आंदोलनासाठी चोखाळलेले मार्गही भिन्न होते. सशस्त्र उठाव करणार्या प्रवाहांचा स्वातंत्र्य आंदोलनातील भाग नाकारणे कृतघ्नपणाचे ठरेल. भागतसिंगाचा मार्ग, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा मार्ग, क्रांतीसींह नाना पाटीलांचा मार्ग, नव सैनिकांचा मार्ग हे “बिना खड्ग बिना ढाल” नव्हते. एवढाच मुद्दा आधोरेखित करावयाचा आहे. तपशिल खूपच विस्तृत आहे.

स्वातंत्र्य आंदोलनाच्या मार्गासंबंधी आणि विचारसरणी संबंधी ज्याप्रमाणे भिन्नता होती त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळे वर्ग आणि वेगवेगळे वर्ण ज्या हेतूने स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते त्या हेतूत ही भिन्नता होती.

स्वातंत्र्य आंदोलनात देशातील तेव्हांचे भांडवलदारही सहभागी झाले होते. आणि त्याच भांडवलदाराच्या कारखान्यात काम करणारे कामगार ही सहभागी झाले होते. शेकडो किंवा हजारो एकर जमिनीचे मालक ही आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्याच शेतीवर राबणारे परंतू रानात शेती नाही आणि गावात घर नाही अशी स्थिती असणारे ही सहभागी झाले होते. उच्चवर्णीय ही सहभागी झाले होते आणि कनिष्ठ समजले जाणारे वर्णही सहभागी झाले होते. सुशिक्षित सहभागी झाले होते. तसेच अल्पशिक्षीत व अशिक्षीतही सहभागी झाले होते. श्र्र्ीमंत वर्ग सहभागी झाला होता. मध्यमवर्ग सहभागी झाला होता आणि श्र्र्मिक वर्ग व दलीत विभाग ही सहभागी झाले होते.

सर्व भारतीयांचे साम्राज्यवादाला विरोध हे समान ध्येय होते. परंतु प्रत्येकाचे मार्ग भिन्न होते, हेतू भिन्न होते आणि सहभागाची तीव्रता व व्याप्ती ही भिन्न होती.

कुणास काय मिळाले, कुणाला काय हवे होते व काय मिळाले?

स्वातंत्र्य आंदोलनात आपल्या संपत्तीसह सहभागी झालेल्या भारतीय भांडवलदारांचा हेतु वेगळा होता. आमच्या देशात ब्रिटीश भांडवलदार उद्योगधंदे करतात आणि त्यात नफा कमावून त्याच्या देशात घेऊन जातात. हे भारतीय भांडवलदारांना नको होते. इंग्रज भांडवलदारांचे भारतातील उद्योगधंदे बंद झाले तर भारतीय भांडवलदारांना जास्त नफे मिळतील आणि तसे ते मिळावेत या हेतूने ते स्वातंत्र्य आंदोलनाला मदत करीत होते. कामगारांचा हेतू अर्थातच वेगळा होता. त्यांना साम्राज्यवादी अवस्थेत ही नफे मिळत नव्हते आणि स्वातंत्र्यातही मिळतील असा त्यांचा हेतू नव्हता. साम्राज्यवादी अवस्थेत आपले आर्थिक शोषण जास्त होते ते स्वातंत्र्यात कमी होईल असा त्यांचा हेतू होता.

म्हणून ते त्या हेतूने स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते जमिदारांना स्वातंत्र्यामध्ये आपणास भांडवलदारां बरोबर सत्तेत सहभाग मिळेल आणि सत्तेतल्या या सहभागामुळे आपल्या संपत्तीत , प्रतिष्ठेत आणि राजकीय वजनात भर पडेल असे त्यांना वाटत होते म्हणून ते स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. रानात शेती व गावात घर नाही अशी अव्बस्था असणारे भूनिहीन शेतमजूर आणि कष्टकरी शेतकरी यांना असे सांगण्यात येत होते की, तुम्हाला कसायला जमिन मिळेल, तुम्हाला चांगली मजूरी मिळेल आणि शेतीतील उत्पन्नाला चांगले भाव मिळतील. कसेल त्याची जमिन अशी जाहीर भूमिका स्वातंत्र्य आंदोलनाने वेळोवेळी घोषित केली होती. त्यावर विश्वास ठेवून हे जन विभाग स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते.

उच्चवर्णीय ब्राम्हण, क्षत्रिय वगैरे यांचा असा हेतू होताकी स्वातंत्र्यात आपल्याला सत्तेत वाटा मिळेल, नोकर्यात व अधिकारांच्या आणि इतर सर्व नोकर्यात आपला सहभाग वाढेल, आपली सत्ता वाढेल बळ वाढेल असे वाटत होते. त्या हेतूने ते आंदोलनात सहभागी झाले होते. आज ज्यांना बी.सी., ओ.बी.सी., एस.टी., एन.टी., व्हि.जे.एन.टी. इ. नावाने संबोधले जाते त्या समाज विभागाला स्वातंत्र्य आंदोलनाने पुन्ह पुन्हा असे सांगित्ले होते की, स्वातंत्र्यामध्ये आर्थिक विषमते बरोबरच सामाजिक विषमता नष्ट केली जाईल. त्यावर विसंबून हे विभागही आंदोलनात सहभागी झाले होते महीलांना असे अश्वासित करण्यात आले होते की, स्त्री पुरूष विषमता स्वातंत्र्यात नाहीशी केली जाईल म्हणून स्त्रीयाही मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सुशिक्षितांना नोकर्यांचे व रोजगाराचे आश्वासन होते. अशिक्षितांना नोकर्यांचे व रोजगाराचे अश्वासन होते. अशिक्षितांना शिक्षणाचे आश्वासन होते. म्हणून ते स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. समाजातील कोणते विभाग कोणत्या हेतूने सामिल झाले होते याची एवढी मोठी यादी देण्याचे कारण स्पष्ट आहे.

कुणाचा हेतू साध्य झाला, किती प्रमाणात साध्य झाला आणि कुणाच्या अश्वासनाची पुर्ती झाली नाही हे याच वर्गीय निकषावर आणि वर्गीय निकषावर तपासले म्हणजे स्वातंत्र्याचा हेतू कुणाच्या बाबतीत किती सफल झाला हे स्पष्ट होते.

भारतीय भांडवलदारांचे नफे गेल्या 65 वर्षात इतके वाढले की ते आता भारतीय जनतेचे शोषण करून थांबत नाहीत तर जगातल्या इतर देशात उद्योगधंदे काढून त्या देशातही नफे कमावू लागले आहे. आणि त्या शेशातील भांडवलदारा बरोबर शोषणाची स्पर्धा करू लागले आहेत. स्वातंत्र्य मिळविण्याचा त्यांचा हेतू पुर्णांशापेक्षाही जास्त साध्य झाला असे दिसते आहे.

सरंजामदारांना आणि जमिनदाार धनदांडग्यांना सत्तेत वाटा मिळाला आहे आणि त्यांच्या धनशक्तीत आणि दंडशक्तीत वाढ झाली आहे आणि ही वाढ होत राहील अशी शक्यताच का खात्री तयार झाली आहे. त्याचाही हेतू साध्य झाला आहे असे निश्चित म्हणता येईल.

शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, शेतकर्यांच्या जमिनी जावून त्या भांडवलदारांच्या ताब्यात जात आहेत आणि त्यांच्यावर भूमिहीन होण्याची पाळी येत आहे. त्यांच्या वाट्याला स्वातंत्र्याची फळे अतिशय कडवट चवीची मिळाली आहेत.

मूठभर उच्चवर्णीय आणि उच्च मध्यमवर्गीयांना चांगल्या नोकर्या मिळाल्या आहेत. आणि त्यांचे बरे चालले आहे. कामगारांना मात्र नोकरीची हमी सुध्दा उरलेली नाही. कंत्राटीकरण वाढते आहे. भांडवलदार धार्जिण्य सरकारने जन आंदोलनाच्या दबावाखाली आणि प्रौढ मतदानावर अधारलेल्या लोकशाहीत मते मिळविण्यासाठी दिखाऊपणा करता येईल म्हणून केलेले किमान वेतन व तत्सम इतर कायदे यांची अंमलबजावणी सुध्दा होते.

महीलांना समता सोडाच परंतू त्यांना आईच्या गर्भात सुध्दा सुरक्षितता राहिली नाही. मनुस्मृतीने दलीतांना आणि स्त्रीयांना जन्माच्या आधारे शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थ लेखनीमधुन तयार झालेल्या भारतीय राज्यघटनेने मनुस्मृतीचा हा कायदा रद्द बातल केला. परंतू त्याच घटने आधारे स्वतंत्र भारताचे राज्य चालविण्याची जबाबदारी स्वीकरलेल्या राज्यकर्त्यांनी नवी व्दी वर्ग शिक्षणव्यवस्था अस्तीत्वात आणली आहे. ज्या पालकांच्या खिशात ज्या प्रमाणामध्ये कमी जास्त पैसे असतील त्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळेल आणि ज्यांच्या खिशात जगायला सुध्दा पैसा नाही त्यांच्या पाल्यांना साक्षरता सुध्दा मिळणार नाही अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

तपशिलात जावून सरकारच्या अधिकृत आकडेवारी अधारे हे सारे तपशिलवार सहज शाबित करता येणे शक्य आहे परंतू त्याची गरज नाही म्हणतात ना हातच्या काकणाला आरसा कशाला?

(१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ७ ऑगस्ट २०१२ रोजी लिहिलेला हा लेख)

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ